Pipeline Burst – दापोडी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यानासमोर जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला आहे. आधीच पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या परिसरात रस्त्यावरुन वाहत वाया जात असलेले पाणी पाहून नागरिकांनी हळहळ आणि संताप व्यक्त केला. खोदकामा दरम्यान जलवाहिनी फुटली असल्याची शक्यता आहे. खोदकामाचे ठिकाण बुजविले असले तरी जमिनीतून पाणी येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून सतत पाणी वाहत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे रस्त्यावर मोठे तळे साचले असून वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उल्लेखनीय बाब अशी गेल्या अनेक दिवसांपासून दापोडी परिसरातील नागरिक पाणी टंचाईचा सामना करत आहे. मागील महिन्यात ही पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली होती. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर पाण्याचे तळे साचत आहे. या पाण्यामुळे रस्त्याचीही हानी होत असून खड्डे पडण्याची शक्यता वाढली आहे. हा परिसर रहदारीचा असल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना विशेष त्रास होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. स्थानिकांच्या मते, अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असताना संबंधित विभागाकडून त्वरित कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा व रस्त्यावर साचलेले पाणी हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.