Pipe Company Fire – वडगाव-आळंदी रोड परिसरातील पाइप निर्मिती करणाऱ्या कंपनीला बुधवारी (दि. ६) दुपारी भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीतील प्लॅस्टिक आणि पीव्हीसी पाइपच्या साठ्याने पेट घेतल्याने काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले. अनेक किलोमीटरवरून हा धूर दिसत होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. दुपारी सुमारे ३:०६ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून अचानक धूर येऊ लागला. काही वेळातच ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला. आग वेगाने वाढत असल्याचे लक्षात येताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने तातडीने मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेरची होती. मात्र, आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीसीएमसी अग्निशमन विभागाने तत्काळ तीन बंब घटनास्थळी रवाना केले. आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने काही दिवस सहकार्य करावे, असे पत्र यापूर्वीच महापालिकेला देण्यात आले होते. त्यामुळे पीसीएमसीच्या जवानांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी कंपनीच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, प्लास्टिक पाइप जळत असल्याने उष्णता प्रचंड होती. विषारी धुरामुळे जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. तरीही जवानांनी धाडसाने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. या आगीत कंपनीतील मशिनरी आणि पाइपचा मोठा साठा जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सायंकाळी उशिरापर्यंत ‘कुलिंग ऑपरेशन’ सुरू होते.