प्रभात वृत्तसेवा देहूगाव – नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी सुरू असलेल्या अभय योजनेची मुदत वाढवून आता २० ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेत करावरील शास्ती (दंड) व व्याज रकमेवर ५० टक्के सवलत दिली जात आहे. वाढत्या प्रतिसादामुळे अंतिम टप्प्यातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती कर विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली. नगरपंचायत हद्दीतील मिळकत कर थकबाकीदारांना प्रति महिना २ टक्के दराने शास्ती व्याज लागू होत असल्याने थकबाकीची रक्कम सातत्याने वाढत आहे. या वाढत्या व्याजातून दिलासा मिळावा यासाठी नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार अभय योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५० टक्के व्याज माफ केले जाणार आहे. यासाठी नगरपंचायत प्रशासनाने दवंडी पिटवली आहे, तसेच अर्ज नगरपंचायतीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत. सुरुवातीला ही योजना १० ऑगस्टपर्यंत लागू होती, मात्र आतापर्यंत सुमारे १५२ मालमत्ता धारकांनी याचा लाभ घेतल्याने आणि उर्वरित थकबाकीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही योजना एकदाच लागू असल्याने, नंतर आलेल्या अर्जदारांना याचा लाभ घेता येणार नाही. थकबाकीदारांनी वेळेत कर भरून, ढोल वाजवून वसुली अथवा जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.