Pinarayi Vijayan : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला पोहोचले आहे. राहुल गांधी यांनी डाव्या लोकशाही आघाडीवर (एलडीएफ) भाजपसोबत साटेलोटे केल्याचा आरोप केल्यानंतर, मुख्यमंत्री विजयन (Pinarayi Vijayan) यांनी गुरुवारी राहुल गांधींवर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर जोरदार टीका केली. राहुल गांधी हे अनुभवातून काहीच शिकत नाहीत आणि काँग्रेस पक्ष हा प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम करत आहे, असा घणाघात त्यांनी केला. एका निवडणूक रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी दावा केला होता की, देशभरातील विरोधी नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करत असताना, मुख्यमंत्री विजयन यांच्यावर मात्र कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई होत नाही. Pinarayi Vijayan हा एलडीएफ आणि भाजपमधील गुप्त समझोत्याचा पुरावा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कोथमंगलम येथील पत्रकार परिषदेत विजयन यांनी या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, राहुल गांधी राष्ट्रीय नेते असले, तरी त्यांच्याकडे एका प्रादेशिक नेत्याइतकीही राजकीय समज नाही. ते वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि जुन्या चुकांतून बोधही घेत नाहीत. काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याचा असा बौद्धिक ऱ्हास होणे खेदजनक असल्याचे ते म्हणाले. विजयन यांनी विविध राज्यांतील उदाहरणे देत काँग्रेसवर निशाणा साधला. दिल्लीत आप नेत्यांच्या अटकेची मागणी करून काँग्रेसने भाजपचा मार्ग सुकर केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच हरियाणा आणि बिहारमध्ये भाजपविरोधी भक्कम आघाडी उभारण्यात काँग्रेसला आलेले अपयशच भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी नमूद केले. केरळमध्ये कम्युनिस्टांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनसंघापासून आरएसएसपर्यंत सर्वांशी हातमिळवणी केल्याचा इतिहास आहे, असेही विजयन म्हणाले. आधीच शोधलेली पळवाट आगामी विधानसभा निवडणुकीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा (युडीएफ) पराभव निश्चित असल्याचे लक्षात आल्याने, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे गुप्त समझोत्याचे खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ही केवळ आपल्या पराभवासाठी आधीच शोधलेली पळवाट असल्याचा टोला मुख्यमंत्री विजयन यांनी लगावला. विजयन (Pinarayi Vijayan) यांनी शेवटी स्पष्ट केले की, काँग्रेस आणि भाजपची मानसिकता एकच असून, देशात भाजपला सत्तेत राखण्यासाठी काँग्रेसच अप्रत्यक्षपणे मदत करत आहे.