पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या तारखांची आश्वासने देत असलेल्या मेट्रो ने अखेर 2022 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरात सीमोल्लंघन केले आहे. महामेट्रोच्या वतीने 31 डिसेंबर रोजी दोनही शहरांच्या हद्दीत मेट्रो रेल्वेची ट्रायल (सराव चाचणी) घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील फुगेवाडी स्थानकापासून ते पुणे महापालिकेच्या हद्दीतील सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ही ट्रायल रन घेण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (7 किमी) आणि वनाझ ते गरवारे (5 किमी) या मार्गांचे उदघाटन देखील पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. अद्यापर्पंत पुणे मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 21 किलोमीटरच्या मार्गांची कामे जोमाने सुरू आहेत. काही महिन्यात उर्वरित कामे पूर्ण होऊन ते प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रेंजहिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक अशा चाचण्या पूर्ण केल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानकचा 17 किलामीटरचा तर वनाझ ते रामवाडी स्थानक 16 किलोमीटरचा असा 33 किलोमीटर लांबीचे दोन मार्ग आहेत.
अशी झाली चाचणी
31 डिसेंबर रोजी मेट्रोने फुगेवाडी स्थानक येथून सकाळी साडे दहा वाजता चाचणी सुरू केली. दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल आणि शिवाजीनगर स्थानक अशी स्थानके पार करून मेट्रो रेल्वे 11 वाजून 15 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथे पोहचली. या चाचणीसाठी 45 मिनिटांचा वेळ लागला. तसेच दुसरी चाचणी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) येथून सुरु झाली. वनाझ (उन्नत स्थानक) येथे 11 वाजून 45 मिनिटांनी पूर्ण झाली. या चाचणीसाठी 25 मीनिटे वेळ लागला. या दोन्ही चाचण्या नियोजित उद्दिष्टनुसार पार पडल्या. एकूण 15 किमी (फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक – 8 किमी आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) – 7 किमी) मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.
फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावरील चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे ही जुळी शहरे मेट्रोमुळे जोडली जाणार आहे. येत्या काही महिन्यांत पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल. पुणे मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित भागांची कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो