लोणावळा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी (दि. ५ जून) लोणावळा शहराचा दौरा केला. शहरातील विविध विकासकामांचा पाहणी दौरा आटोपल्यानंतर नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली, त्यानंतर जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आदेश देत येत्या सोमवारपासून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामनंतर, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरास भेट देऊन प्रस्तावित ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी, सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), भूमि अभिलेख, विद्युत व परिवहन विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी यांसह लोणावळा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, भाजी मंडई व्यापारी, पथविक्रेते, टपरी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली लोणावळा भाजी मंडईची दुरुस्ती व व्यवस्थापन खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या मागण्या शहरात नवीन पर्यटन केंद्र विकसित करण्याची गरज वाहतूक कोंडीवर उपाययोजना व पर्यटकांची सुरक्षितता