Pimpri : पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये महिलांचे मोलाचे योगदान

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. यामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदानही खूपच महत्त्वाचे असून शहरातील ३२ प्रभागात कायमस्वरूपी ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत.
जागतिक महिला दिन शनिवारी (दि. ८) सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जाते. पिंपरी चिंचवड शहरामध्येही तब्बल ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी कार्यरत आहेत.
या महिलांमुळेच शहर स्वच्छ राहते, शिवाय शहरातील स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शहरात पहाटेपासून सुरु होणारे दैनंदिन साफसफाईचे काम याच स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने अव्याहतपणे सुरु आहे. या महिला कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका देखील पुढाकार घेत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. याशिवाय प्रसूती रजा, बाल संगोपन रजा देण्यात येतात. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे, इतर आवश्यक सोयीसुविधा देणे, यासाठीही पालिका सातत्याने प्रयत्न करीत असते. शहराची स्वच्छता करण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी भगिनींना महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा.
– शेखर सिंह,आयुक्त तथा प्रशासक





