संदीप घिसे पिंपरी – शहरात सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. विविध राजकीय समीकरणे आणि उमेदवारीच्या चर्चेत आता मेरिट सर्व्हेने खळबळ उडवून दिली आहे. शहर भाजपमध्ये उमेदवारीसाठी ‘मेरिट सर्व्हे’चा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे नव्याने पक्षप्रवेश केलेल्या इच्छुक आणि माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. “निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही,” या पक्षाच्या भूमिकेनंतर ‘उमेदवारी मेरिटवरच दिली जाईल’ अशी घोषणा स्थानिक नेत्यांकडून होत असल्याने अंतर्गत नाराजीला उधाण येण्याची शक्यता आहे. या ‘मेरिट सर्व्हे’मुळे काही माजी नगरसेवकांवर टांगती तलवार कायम आहे. पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये वाद हा नेहमीचाच झाला आहे. प्रभागातील सर्व इच्छुकांनी आता एकत्र येत कोणालाही उमेदवारी मिळाल्यास सर्वजण एकदिलाने काम करू, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमेदवारीच्या अपेक्षांनी भरलेल्या राजकीय वातावरणात मेरिटमध्ये कोण हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे सर्व जुने कार्यकर्ते एकत्र आले असून जुन्या लोकांना उमेदवारीसाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच पक्षांच्या जुन्या नेत्यांकडे केली आहे. भाजपमध्ये अंतर्गत समीकरणे जुळविण्याची धडपड सुरू असताना महाविकास आघाडी मात्र सावध भूमिकेत आहे. महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांच्या जोर बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीविरोधात नव्हे, तर महायुतीतील अंतर्गत स्पर्धेतून आकार घेणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे ७७ नगरसेवक होते. तर महापालिकेची ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे भाजपने यापूर्वीच घोषित केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यापूर्वी शहर भाजपने अब की बार १०० पार असा नारा दिला होता. मात्र बिहार येथील निवडणूक निकालानंतर पक्षाचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे १०० पारचा आकडा वाढवून ११० पार केला आहे. नव्या नगरसेवकांची स्थिती अनिश्चित झाली आहे. “मेरिट” निकष कोणावर आणि कसा लागू होईल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते इच्छुकांना टिकवून ठेवण्यासाठी रणनीती आखत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात उत्साहाचा अभाव जाणवतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे हेच आव्हान ठरणार आहे. तर या तीन पक्षातील महापालिका निवडणुकीच्या लढाईचे नेतृत्व कोण करणार, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. राजकीय समीकरणांची नवी जुळवाजुळव सुरू भाजपच्या प्रदेश पातळीवरून गोपनीयरित्या सुरू असलेल्या ‘मेरिट सर्व्हे’ चर्चेने नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे धुके निर्माण केले आहे, तर महाविकास आघाडीतील संभ्रमाचे वातावरण या निवडणुकीला अधिक अनिश्चित बनवित आहे. पिंपरी-चिंचवडच्या महापालिका रणांगणावर अखेरचा सामना “आघाड्यांमधला नव्हे, तर आतल्या संघर्षाचा” ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.