वडगाव मावळ: उन्हाळा ऋतू यातही एप्रिल, मे, जून हे महिने म्हणजे रानमेव्याची चव चाखण्याचे दिवस. मावळ तालुका हा डोंगर दऱ्यांचा तालुका असून येथील जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रान फळे मिळून येतात. यात डोंगरची मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदे सोबत जांभूळ, आळू, तोरण, आमगुळ, कैरी यांचा समावेश होतो. हा सर्व रानमेवा येथील आदिवासी कुटुंबाच्या जगण्याचा आधार ठरला आहे. दोन महिने जंगलातील हा रानमेवा तोडून तो स्थानिक बाजारांत विकून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ हे आदिवासी चालवत असून हा रानमेवा त्यांच्या जगण्याचा आधार ठरला आहे. मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ आदी विभागातील सह्याद्री पर्वताच्या डोंगरी भागात करवंदाच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात असून ही करवंदे एप्रिल महिन्यापासून तयार होतात. तयार झालेली ही करवंदे अर्थात डोंगरची मैना काटेरी जाळीतून तोडून ती विक्रीसाठी लोणावळा, कामशेत, तळेगाव, वडगाव, देहूरोड, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे या बाजारपेठेत नेली जातात. करवंदाच्या हंगामामुळे त्या त्या भागातील बेरोजगार नागरिकांना खास करून आदिवासी कुटुंबांना उत्पन्नाचे मोठे साधन मिळते. उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने याच व्यावसाातून ही लोकं आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. आंदर मावळातील वडेश्वर, वहानगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, खांडी, कुसुर, सावळा, कळकराई, माळेगाव, पिंपरी बुद्रुक, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, कल्हाट ही गावे ; नाणे मावळातील उकसान, पाले, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, भाजगाव ही गावे ; पवन मावळातील आपटी, गेव्हंडे, आतवण, कोळे चाफेसर, तुंग, मोरवे, चावसर, बोडशिळ, शिळींब, वाघेश्वर, कादव, आजिवली, जवण, तिकोणा, मळवंडी ठुले, धालेवाडी, मालेवाडी, लोहगड, धनगव्हाण, येलघोल, दिवड, ओवळे, राजेवाडी या सर्व गावांच्या जवळपास डोंगर टेकड्या असून येथील जंगलातील रानमेव्यावर परिसरातील आदिवासी कुटुंबांचे अर्थार्जन होत आहे. करवंदे तोडण्यास एक दिवस लागतो. ती करवंदे बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी सकाळी त्या त्या भागातील मुक्कामी एसटीतून तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, पिंपरी-चिंचवड पुणे पर्यंत प्रवास करावा लागतो. दिवसभराची भाकरी बांधून न्यावी लागते. दिवसभर करवंदे विकल्यानंतर ७०० ते १००० रुपये सुटतात, असे एका आदिवासी महिलेने सांगितले. करवंदाला मिळतोय चांगला भाव सध्या बाजारात करवंदाचा भाव चाळीस रुपये पावशेर म्हणजेच १५० ते २०० रुपये किलो असा असून दहा किलो करवंदापासून १५०० ते २ हजार रुपये उत्पन्न मिळते. परंतु यासाठी कुटुंबातील किमान दोन ते तीन माणसांना करवंदे तोडण्याचे काम करावे लागते. साधारणपणे एक पाटीभर म्हणजेच ९ ते १० किलो करवंदे तोडण्यासाटी दोन माणसांना एक दिवस लागतो, तर तीच करवंदे विकण्यासाठी एका माणसाला शहरातील बाजारपेठेत संपूर्ण दिवस घालवावा लागतो. नऊ ते दहा किलो करवंदे असलेल्या पाटीमध्ये तीन माणसांना रोजगार उपलब्ध होतो.