पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे. महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना देखील अंतिम झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार ०८९ मतदारसंख्या होती. गेल्या आठ वर्षात या आकडेवारीत वाढ होवून यंदा महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५ लाख १६ हजार ६९८ एवढे मतदार वाढले आहेत. यामध्ये शहरातील लोकसंख्येत झालेली वाढ आणि नवमतदारामुळे मतदार संख्येत वाढ झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. ही वाढ कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार हे निकालात स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या निवडणुक विभागाकडून प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका या दिवाळीनंतर जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून कामकाज वाटप, निवडणुकीच्या अनुषंगाने पुर्व तयारी सुरू आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर नगरसेवकांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. आता प्रशासकीय राजवटीत देखील साडेतीन वर्ष पुर्ण झाली आहेत. सन २०१७ मध्ये शहराची मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ०८९ इतकी आहे. त्यानंतर शहराच्या मतदार संख्येत ५ लाखांनी भर पडली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी होती. ही लोकसंख्या आता ३० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे मतदार संख्येतही मोठी वाढ झालेली आहे. फेब्रुवारी २०१४ आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सन २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली होती. फेब्रुवारी २०१७ नंतर आता ही निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्यात आली आहे. असे असले तरीही, आतापर्यंतच्या मतदार संख्या लक्षात घेऊन प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. सध्यस्थितीत शहरात एकूण १७ लाख ८ हजार ७८७ एवढी मतदारसंख्या असून सन २०१७ नंतर ५ लाख १६ हजार ६९८ इतकी मतदार संख्येत वाढ झालेली आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख ७९ हजार ८५८ इतके मतदार आहेत. त्यात ३ लाख ५६ हजार ५२५ पुरुष आणि ३ लाख २३ हजार २७४ महिला व ५९ तृतीयपंथी मतदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख २९ हजार १२९ मतदार आहेत. त्यात पुरुष ३ लाख ३८ हजार ३२२, महिला २ लाख ९० हजार ७०७ व तृतीयपंथी १०० मतदार आहेत. पिंपरी विधानसभेत एकूण ३ लाख ९९ हजार ५०० मतदार आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कसरत राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम अद्याप आलेला नाही. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रभाग निहाय मतदार यादीचे काम करण्यात येणार आहे. विधानसभेची मतदार यादी फोडून १ ते ३२ अशी प्रभागात विभागली जाईल. त्या ३२ मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करण्यात येतील. एका प्रभागात मतदार संख्या ४५ ते ५५ हजार इतकी असणार आहे. प्रभागात वाढलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. ‘प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देश आलेले नाहीत. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निहाय मतदार यादी मागविण्यात आली आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर प्रभाग निहाय मतदार याद्या फोडण्यात येतील. मात्र, मतदार यादी कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरायची? याबाबत काहीच सूचना नाहीत.’- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त सध्या शहराचे विधानसभा आणि मतदार संख्या पिंपरी : ३ लाख ९९ हजार ८०० चिंचवड : ६ लाख ७९ हजार ६५८ भोसरी : ६ लाख २९ हजार १२९ एकूण : १७ लाख ८ हजार ७८७ फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीतील मतदार संख्या- ११ लाख ९२ हजार ८९ आगामी निवडणुकीसाठी मतदार संख्या – १७ लाख ८ हजार ७८७