Pimpri : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाला तिसरी आणि चौथी मार्गिका कधी मिळणार?

पिंपरी : पुणे लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेला मंगळवारी (दि. १२) ४७ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाला तिसर्या आणि चौथ्या मार्गिकेची प्रतिक्षा आहे. प्रवाशांची ही मागणी कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या पुणे लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात. मागील 46 वर्षात एकदाही पुण्याला नवीन फ्रेश फॅक्टरी आऊट ईएमयु लोकल रेक मिळाला नाही. मुंबई उपनगरात वापरून पुण्याला दिलेल्या जुन्या लोकल रेक मधूनच पुणे-लोणावळा दरम्यान लोकलचा प्रवास होत आहे.
करोनानंतर लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. शिवाजीनगरला लोकलसाठी विशेष प्लॅटफार्म तयार करुन येथून तळेगाव आणि लोणावळासाठी चौदा लोकल धावतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंचलित सिंग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले. त्यामुळे रेल्वे गाड्या अचूक वेळेत धावून प्रवासाच्या वेळेत बचत झाली.
पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे स्थानके
पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली, लोणावळा अशी ६०.५९ किलोमीटर अंतरावर १७ स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर, खडकी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, मळवली या स्थानकांवर रेल्वे पासिंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.
पुणे लोणावाळा स्वयंचलित सिग्नल यंत्रणा पुर्ण झाल्याने दोन गाड्यांमधील अंतर कमी झाले आहे. याचा फायदा लोकलच्या प्रवाशांना मिळावा. गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या. तसेच मार्गावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लवकरात लवकर पुणे लोणावळा तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरु करणे आवश्यक आहे.
– ईक्बाल मुलाणी, माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटना
प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
– तिसरी आणि चौथी मार्गिका लवकर सुरु करणे
– पीक अवर मध्ये फास्ट लोकल सुरु करणे
– मेधा किंवा बमबार्डियार (अलस्ट्रॉम) पद्धतीचे रेक द्यावेत
– लोकल फेऱ्या वाढवाव्यात
– दुपारच्या वेळी लोकल फेऱ्या सुरु कराव्यात
– मुंबई प्रमाणे पुणे-लोणावळा दरम्यानचा १५ डब्याच्या लोकल सुरु कराव्यात





