Pimpri : आजपासून दीड दिवस आळंदीचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी : सिद्धबेट येथील मेन रायजिंग पाइपलाइनच्या गळती दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने आजपासून (दि.23) पुढील दिड दिवस आळंदीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामाला दिड दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माधव खांडेकर यांनी केले आहे.
गेली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून आळंदीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत दोन महिन्यांपुर्वी झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिले होते. मात्र या आश्वासनाचा विसर पडल्याने संतप्त नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयावर मोार्च काढला होता. यावेळी देखील आंदोलकांना मुध्याधिकारी खांडेकर यांनी सुरळीत पाणीपुरवठ्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे.
तर, नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर बेकायदेशीरपणे अनेक नळजोड दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याशिवाय आळंदीच्या विविध भागांत सरासरी पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने वॉटर टँकर लॉबीची चांदी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.





