Pimpri : पेट्रोलमध्ये पाणी! शेकडो दुचाकी पडल्या बंद

पिंपरी : पूर्णानगर, चिखली येथील एचपी पेट्रोल पंपावर नागरिकांच्या चारचाकी आणि शेकडो दुचाकी वाहने बंद पडली. यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर धाव घेत याबाबत जाब विचारला. ही घटना सोमवारी (दि. १७) रोजी भोसले पेट्रोल पंपावर घडली. याबाबतचा व्हिडीयो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील पेट्रोल पंपावर धाव घेतली परंतु कुणीही तक्रार देण्यास तयार झाले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी अनेक नागरिकांनी आपल्या चारचाकी व दुचाकीमध्ये पूर्णानगर, चिखली येथील भाेसले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. मात्र काही अंतरावर गेल्यावर त्यांची वाहने बंद पडली. याबाबत काही जणांनी गॅरेजवाल्याकडे धाव घेतली असता पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे दिसून आले.
यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भोसले पेट्रोल पंपाकडे धाव घेत याबाबत जाब विचारला. तसेच पेट्रोल पंप मालकाने पेट्रोलचे पैसे आणि वाहन दुरुस्ती लागणारा खर्च देण्याची मागणी वाहन चालकांनी केली.
तक्रार द्यायला कुणी तयार नाही
याबाबत बोलताना चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे म्हणाले की, पेट्रोल पंपावर गोंधळ सुरू असल्याचा कोणतीही माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली नाही. ऑनलाइन बातम्या वाचून आम्ही त्याठिकाणी गेलो होतो. तिथे जमलेल्या सर्व नागरिकांना कोणाला तक्रार द्यायची आहे का, अशी विचारणा केली. मात्र तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तसेच पेट्रोल पंप चालकाने इथेलॉनचा पाण्याशी संपर्क आल्यावर सर्व इथेलॉनचे पाणी होते, असे सांगितले. मात्र पेट्रोल साठवणीच्या टाकीत पाणी पाणी कोठून आले याबाबत आम्ही देखील शोध घेत आहोत.
काय होते पेट्रोलच्या टाकीत पाणी गेल्यास ?
इथेनॉल पेट्रोलपेक्षा जड असल्याने या इथेनॉलचा थर पेट्रोल टाकीच्या तळाशी जमा होतो. या थरामुळे फ्लोट पाइपमध्ये इथेनॉल अडकून बसते. परिणामी, इंधन पुरवठा इंजिनला न झाल्याने एक तर स्टार्टंगि ट्रबल येते. यामुळे चारचाकी / दुचाकी सुरुच होत नाही.





