Pimpri : प्राणीसंग्रहालयावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरूच

पिंपरी : गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेल्या तसेच वादग्रस्त ठरलेल्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाचा पुढचा टप्पा वादात सापडला आहे.या प्राणीसंग्रहालयावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. तर प्रशासनाने चक्क कमी दराने निविदा सादर केलेल्या ठेकेदाराला काम न देता ज्यादा दराने काम करणाऱ्या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या चुकांमुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून अधिकारी संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत.
चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे. त्यावर यापूर्वी तब्बल २० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. असे असताना या प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम संपलेले नाही. संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे प्राणिसंग्रहालयाचे टाळे कायम आहे. कामादरम्यान प्राणिसंग्रहालयातील विविध प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून टीका आणि महापालिका प्रशासनाची बदनामी झाली .
प्राणीसंग्रहालयाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप यापूर्वी झालेले आहेत. सल्लागार नियुक्ती, वाढीव खर्च यावरून प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते. नागपूर येथील डिसेंबर २०२३ ला झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरून गंभीर आरोप झाले होते. अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेची संपूर्ण राज्यात बदनामी झाली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने कारभारात सुधारणा केली नाही.. निविदा प्रक्रियेत अटी-शर्ती व ठेकेदार निश्चितीचा शाब्दिक घोळ घालत दोन कोटींचे आर्थिक नुकसान करून हे काम देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.
जादा दर सादर केलेल्या ठेकेदाराला काम
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयामध्ये आणखी काही कामे सुचविण्यात आली. त्यासाठी महापालिकेने २४ कोटी २ लाख १६ हजार ६८ रूपये खर्चाची निविदा ९ ऑगस्ट २०२४ ला प्रसिद्ध केली होती. त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील एक ठेकेदार अपात्र झाल्याने दोन ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या. यामध्ये हायवे कन्ट्रक्शन या कंपनीने १०.८९ टक्के कमी दराची निविदा, तर स्कायवे इंन्फ्राप्रोजक्टस कंपनीने ८.८८ टक्के ज्यादा दराची निविदा सादर केली होती. परंतु, दर कमी करून स्कायवे इंन्फ्राप्रोजक्टस या कंपनीची २ टक्के कमी दराची २३ कोटी ६४ लाख ९४ हजार ९२६ रूपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली. मात्र, हे दर हायवे कन्ट्रक्शन कंपनीने सादर केलेल्या दराच्या तुलनेत अधिक आहेत. निविदाप्रक्रिया गुणांकन पध्दत, अटी-शर्तीचा वापर करून जास्त दराने काम दिले गेले. परिणामी, यात महापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे.
ठेकेदार निश्चित करताना गुणांकन पध्दतीचा वापर केलेला आहे. निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे काम करण्यास पात्र, गुणवत्ताधारक ठेकेकादार कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्राणीसंग्रहालयाचे विशेष काम असल्याने यामध्ये आर्थिक बाबींबरोबर ठेकेदार कंपनीची गुणवत्तादेखील विचारात घेतलेली आहे.
– मनोज सेठिया, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका





