पिंपरी – गेल्या काही वर्षांपासून काळा खडक परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चार जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी त्यांच्या परिसरातून बुधवारी (दि. २५) धिंड काढली. अरविंद गौरवसाठी (वय २०,) सूरज पंडित पवार (वय २१), राहुल उर्फ बुग्या हिरामन लष्करे (वय १९) आणि विशाल शहाजी कसबे (वय २३ सर्व रा. काळा खडक, वाकड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून आरोपी परिसरात दहशत निर्माण करत होते यामुळे आरोपी कसबेला पोलिसांनी तडीपार केले आहे. तरी देखील तो आपल्या साथीदारांच्या मदतीने परिसरात येऊन दहशत निर्माण करीत होता. दोनच दिवसांपूर्वी मल्लारी मोतीराम लोंढे यांनी गुन्हेगारांना दुकान भाड्याने न दिल्यामुळे त्यांचे अपहरण करून त्यास मारहाण केली. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी सकाळी या चारही आरोपींना घेऊन पोलिस काळा खडक परिसरात दाखल झाले. पोलिसांनी काळा खडक परिसरात आरोपींची धिंड काढत त्यांना चांगला चोपही दिला. आरोपींची ही धिंड पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ‘वेल डन’ वाकड पोलीस – वाकड परिसरात दशहत पसरवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांची पोलीसांनी धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.