Pimpri : अवकाळी पावसाने आयटी परिसर झोडपला

हिंजवडी : आयटी परीसरात गुरूवारी (दि. 15 ) दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने हिंजवडी, माण, मारुंजी परिसर चांगलाच झोडपून काढला. तर पहिल्याच पावसात आयटी परिसरातील अनेक रस्ते तुंबले असल्याने रस्त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
मागील काही दिवस जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. अचानक आलेल्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा तयार केला. अनेक शेतकऱ्यांची काढणीस आलेली उन्हाळी बाजरीची पिके भुईसपाट झाली. त्यामुळे या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.
हिंजवडी माण ,मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई परिसरात चांगला दमदार पाऊस झाल्याने बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक धोक्यात आले असून काही जणांचे काढलेले कांदे भिजले. काही शेतकऱ्यांची वखारीत कांदे टाकण्याची लगबग सुरू होती. मात्र धो धो पाऊस बरसल्याने कांदे भिजून मोठे नुकसान झाले.
माण, नेरे, जांबे भागातील वीटभट्टी मालकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेकांनी मोठमोठ्या ताडपत्र्या आणून वीट भट्टया झाकल्या होत्या. मात्र या पावसात थापलेल्या कच्च्या विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वीट उत्पादकांनी सांगितले.
रस्त्यांवर चोहीकडे पाणीच पाणी
हिंजवंडी, माण व मारुंजी रस्त्यांवर दुकानदारानी लगतची गटारे बुजविल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी वाहत होते. त्यामुळे पहिल्याच पावसात चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले. पाण्यातुन वाट काढतांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर काही ठिकाणी रस्त्यावर ऑइल सांडल्याने त्यावरून घसरून दुचाकीस्वार पडले.





