पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उमेदवार, समर्थक व नागरिकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने संबंधित परिसरात वाहनांची ये-जा नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे ठराविक वेळेत काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामनिर्देशन केंद्राच्या आसपास अनावश्यक वाहतूक, रस्त्यावर थांबणारी वाहने व मिरवणुकीसदृश्य हालचालींमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, विनाकारण वाहन घेऊन संबंधित परिसरात येऊ नये, तसेच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन व अत्यावश्यक सेवांना या वाहतूक बदलांमधून वगळण्यात आले असून, त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक बदलांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चिखली वाहतूक विभाग अंतर्गत पिंपरी, फुलेनगर व लांडेवाडी चौकाकडून हॉकी स्टेडीयम चौक मार्गे क क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. पिंपरीकडून येणारी वाहने हॉकी स्टेडीयम चौकातून डावीकडे वळून अनुकूल कंपनी समोरून, गुलाब पुष्प उद्यान समोरून अनुकूल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. फुलेनगरकडून येणारी वाहने हॉकी स्टेडीयम चौकातून सरळ अनुकूल कंपनी गेट समोरून, गुलाब पुष्प उद्यान समोरून अनुकूल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. लांडेवाडी चौकाकडून येणारी वाहने ईश्वर मेटल कॉर्नर (एयुओ कंपनीचे मेन गेट) समोरून सरळ गुलाब पुष्प उद्यान मार्गे इच्छित स्थळी जातील. भोसरी वाहतूक विभाग अंतर्गत कासारवाडी शास्त्री चौक ते ज्ञानराज शाळा दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. शास्त्री चौकाकडील वाहने विसावा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. ज्ञानराज शाळेकडील वाहने दत्त मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील. निगडी वाहतूक विभाग अंतर्गत संभाजी चौकातून आकुर्डी पोलीस चौकी समोरील रोडने हेगडेवार भवन, प्राधिकरण निगडीकडे जाणाऱ्या वाहनांना सरळ मेन रोडने जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संभाजी चौकाकडून येणारी वाहने आकुर्डी पोलीस चौकी समोरील रोडवरून हेगडेवार भवन प्राधिकरण समोरील विरुद्ध बाजूच्या मेन रोडने, हुतात्मा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.