Pimpri : मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात टीओडी झोन

स्थानकाजवळच्या परिसरात वेगळा आराखडा तयार करुन नियोजन
– अंमलबजावणीसाठी सल्लागारी संस्थेची नेमणूक
पिंपरी – शहरात दापोडी ते पिंपरी मेट्रो सेवा सुरू झाली असून पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरु आहे. भविष्यात निगडी ते चाकण मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. शासनाच्या नियमावलीनुसार मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिघात ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन (टीओडी) घोषित केला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र नियोजन आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी सल्लागारी संस्थेची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आराखडा तयार करून मेट्रो स्टेशनजवळ वाहतूक, दळणवळण, नवीन बांधकामे आणि गर्दीचे नियोजन केले जाणार आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ट्रान्झिट ओरिएन्टेड झोनचा (टीओडी) आराखडा तयार करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यास स्थायी समितीची मान्यता दिली. हे काम महापालिकेचा विकास आराखडा तयार करणाऱ्या मे. एससीपी डिझाइन, प्लॅनिग ॲन्ड मॅनेजमेंट या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत आगामी नऊ महिन्यांत नियोजन आरखडा तयार केला जाईल. यामध्ये चालू झालेल्या सहा, काम चालू असलेल्या निगडीपर्यंतच्या चार आणि वाकडमधील एका स्टेशनचा समावेश आहे. त्या स्टेशनजवळ ५०० मीटर परिघात लोकल एरीया प्लॅनिंग केले जाणार आहे. त्या आराखड्यानुसारच भविष्यात बांधकाम परवानगी, वाहतूक नियोजन आणि इतर प्रकल्प केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मेट्रो प्रकल्पाची स्वारगेट ते पिंपरी मार्गावर मेट्रो सेवा सुरु आहे. तर, पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. सद्यस्थितीत पिंपरी ते दापोडी या सात किलोमीटर अंतरावर पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावत आहे. निगडी भक्ती-शक्ती चौक ते चाकण या नवीन मेट्रो मार्गाची आखणी करण्यात आली आहे. पीएमआरीडएच्या वतीने हिंजवडी मेट्रोचे काम सुरू असून या मेट्रोचे एक स्टेशन पालिका हद्दीत आहे. मेट्रो स्टेशनच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतराच्या परिघात हा टीओडी झोन निश्चित करण्याचे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे.
डीपीमध्ये टीओडी झोनचा समावेशच नाही
महापालिकेच्या नगररचना विभागाने नुकताच प्रारुप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यावर हजारो हरकती दाखल झाल्या आहेत. हा विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने मेट्रो स्टेशनच्या परिसरात टीओडी झोनचा समावेश करणे अपेक्षित होते. परंतु, विकास आराखड्यामध्ये या झोनचा समावेश न केल्यामुळे यासाठी नव्याने कार्यवाही करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. नगररचना विभागाच्या चुकीमुळे पुन्हा एजन्सीची नेमणूक करून हा आराखडा तयार करावा लागणार आहे.
युडीसीपीआर नियमानुसार मेट्रो स्टेशनजवळ हा टीओडी झोन निश्चित केला जातो. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. एजन्सीकडून नऊ महिन्यांत हा आराखडा तयार केला जाईल. नंतर शासनाच्या मान्यतेने शहरात या आऱाखड्याची अंमलबजावणी केली जाईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका





