Pimpri : यंदा दिवाळीत चांदीला झळाळी; लक्ष्मीपूजनाला खरेदीला उधाण

पिंपरी – दिवाळी जवळ आली की बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळतो. यंदा या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्यापेक्षा चांदीला अधिक झळाळी मिळाली आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील सराफा बाजारात चांदीची विक्रमी मागणी वाढली आहे.
१५ आॅक्टोबर रोजी चांदीचा दर आपल्या सर्वोच्च पातळीला पोहचला होता. चांदीचा दर सुमारे एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत पोहचला होता. परंतु हळहळू उतरत एक लाख ७० हजार रुपयांच्या जवळपास आला. यामुळे नगारिकांनी जबदरस्त मोबदला मिळवून देणाऱ्या या धातुंवर आपला विश्वास दाखविला. तर सोन प्रति दहा ग्राॅम एक लाख २८ हजार रुपयांवर पोहचले असून ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कायम होता.
भारतीय परंपरेनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीची वीट, नाणे किंवा छोटे बार घरात पूजेसाठी ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे शहरातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी नाणी आणि बारसाठी वेटिंग यादी असून, ग्राहकांना आठ-दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी माहिती बाजारातील जाणकारांनी दिली. मागणी-पुरवठ्यामधील तफावतीमुळे किमतीत वाढ झाली आहे.
चांदीची कमतरता केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आहे. लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंत मागणी आणि पुरवठा, यामध्ये तफावत वाढली आहे. त्यामुळे भाव चढतच जाण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
सोन्याच्या तुलनेत चांदी अजूनही परवडणारी असल्याने मध्यमवर्गीय ग्राहक याकडे अधिक वळले आहेत, परिणामी, सोन्यापेक्षा चांदीला जास्त मागणी असून दिवाळीला ग्राहकांनी चांदीमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक वापर, गुंतवणूक आणि सणासुदीची खरेदी या तिन्ही कारणांनी चांदीत प्रचंड तेजी आली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरचा दर व आयातीवरील वाढलेले शुल्कही किंमत वाढीला चालना देत आहेत, असे सराफांनी सांगितले.
२०२५ मधील चांदीचा चढता आलेख (सर्वोच्च दर प्रति किलो रुपयांत)
जानेवारी – १,०७,०००
मार्च – १,१४,०००
जून – १,१७,०००
सप्टेंबर – १,६१,०००
ऑक्टोबर – १,९०,०००
सराफांकडे आगाऊ बुकिंग
यावर्षी लक्ष्मीपूजनासाठी चांदीच्या नाण्यांची मागणी दुपटीने वाढली आहे. मात्र, पुरवठा मर्यादित असल्याने आम्हाला आगाऊ बुकिंग घ्यावे लागत आहे, असे प्रमुख सराफांनी सांगितले. गेल्या नऊ महिन्यांत चांदीच्या दरात ४५ ते ५० हजार रुपयांची वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांचा चांदी खरेदीकडे ओढा कायम आहे. विशेषतः मध्यमवर्गीय ग्राहक गुंतवणुकीसाठी आणि पूजेसाठी चांदीकडे अधिक आकर्षित होत आहेत.
दरांमध्ये वाढ होऊन देखील यंदा ग्राहकांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये आपला विश्वास दाखविला. गेल्या २५ वर्षांमध्ये या दोन धातुंनी नागरिकांना भरभरुन मोबदला दिला आहे. मध्यमवर्गासाठी आजही सोने आणि चांदी हेच गुंतवणुकीचे उत्तम पर्याय म्हणून टिकून आहेत.- विलास भांबुर्डेकर, संचालक, भांबुर्डेकर ज्वेलर्स





