पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडला. मात्र तालेरा रुग्णालयाचे कामच पूर्ण नसल्याचे दै. ‘प्रभात’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. दोन वॉर्डात फक्त लाकडी बेड आहेत. पण त्यावर गाद्या नाहीत. ओपडी व इतर विभागात टेबल, कपाट आहे पण खुच्र्याच नाहीत. इतरही कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण नसताना महापालिकेने उद्घाटनाची घाई का केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर अधिकारी सांगत आहेत की, रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास सहा महिने लागतील.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडमध्ये २५० बेडचे मल्टी स्पेशाॅलिटी रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाचा लोर्कापण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या पाश्र्वभूमीवर दै. प्रभातच्या प्रतिनिधीने या नवीन रुग्णालयाची पाहणी केली. तालेरा रुग्णालयाचे ८० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसून येते. असे असताना महापालिकेने रुग्णालयाच्या उद्घाटनाची घाई का केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेडही नाहीत… सुविधा तर दूर
नवीन तालेरा रुग्णालयाची पाच मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर ओपीडी विभाग असून त्यातील फक्त गरोदर महिला तपासणी केंद्रात टेबल आणि खर्ची आहेत. मात्र रुग्णांना तपासण्यासाठी साधा बेडही नाही. इतर ओपीडी विभागात कुठेच खुर्ची नाहीत. केसपेपर काढण्यासाठी पाच खिडक्या आहेत. मात्र रुग्ण तपासणी कक्षात डॉक्टरांना लिहिण्यासाठी केवळ टेबल आहेत. इतर कोणतीही सुविधा नाही. शस्त्रक्रिया विभाग, डायलिसेस विभाग, अतिदक्षता विभाग हे सर्व रिकामे असून त्यात कोणतीही सामग्री नाही. शस्त्रक्रिया विभागात बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. बहुतांश वॉर्ड रिकामेच असून त्यात साधे बेडही नाहीत.
प्लंबिंग आणि फर्निचरची कामे अपूर्ण
अनेक ठिकाणी स्वच्छतागृह आहेत. मात्र तेथील प्लंबिंगची कामे अपूर्ण आहेत. दोन वॉर्डात लाकडी बेडचा सांगाडा आहे. मात्र त्याची उंची खूपच खाली आहे. त्यामुळे परिचारिका यांना रुग्णसेवेचे काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. इतर वॉर्ड मात्र खाटांविना संपूर्ण रिकामेच पडलेले आहेत. काही ठिकाणी कामाचा कचरा तसाच पडून आहे. ओपीडी विभागात केसपेपर काढण्यासाठी पाच खिडक्या असून ती जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. ओपीडी विभागात तीनच ठिकाणी लोखंडी खुर्ची तर पाच ठिकाणी स्टीलच्या खुर्ची रुग्णांना बसण्यासाठी बाहेर आहेत.
ओपीडी सुरु झाल्याचे खोटे दावे
महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी गोफणे यांनी शुक्रवारपासून नवीन रुग्णालयात ओपीडी सुरु झाल्याचा दावा केला. परंतु येथे कुणीही नव्हते. ओपीडीत देखील रुग्णांना तपासण्यासाठी आवश्यक सुविधा दिसून आल्या नाहीत. कोणतीच तयारी नसताना उद्घाटनाची घाई महापालिकेने का केली ? याबाबत चर्चा सुरु आहेत.
नवीन तालेरा रुग्णालयात शुक्रवार (दि. ७) पासून ओपीडी सुरू केली आहे. रुग्णालयासाठी लागणा-या सर्व गोष्टी तयार आहेत. केवळ मनुष्यबळ नाही. नवीन तालेरा रुग्णालय हे २५० बेडचे असून त्यात आयसीयू, एनआयसीयू, डायलिसेस विभागही आहे. सुरूवातीला ५० बेड सुरू करणार आहोत, पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू व्हायला सहा महिने लागतील.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी