पिंपरी – कंपनीतील मानसिक त्रासातून न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी एका पीडित महिलेकडून ७० हजार रुपये उकळले. त्यानंतर कंपनीच्या एचआर विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत त्यांनी फिर्यादी महिलेस दोन दिवस डांबून ठेवले. तसेच पीडित महिलेकडूनच आणखी एक लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी पुन्हा खंडणी उकळली दिली. ही घटना सप्टेंबर २०२४ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चाकण येथे घडली.या प्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने सोमवारी (दि. १५) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण येथील दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला त्यांच्या कंपनीतील एच. आर. हेडकडून झालेल्या मानसिक त्रासाबाबत न्याय मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यासाठी त्यांनी कंपनीच्या एच.आर. हेड विरोधात तक्रार अर्ज घेतला आणि कामासाठी पैसे लागतील असे सांगून सप्टेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या दरम्यान वेळोवेळी रोख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर, आरोपींनी एच.आर. हेडकडूनही प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली पैसे घेतले. त्यानंतर फिर्यादीवर तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला. दबावतंत्राचा भाग म्हणून १९ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान महिलेस एका आरोपी महिलेच्या घरात दोन दिवस डांबून ठेवण्यात आले. तसेच, त्यांनी पुन्हा पीडित महिलेकडेच एक लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास ‘कोठेतरी नेऊन टाकून देऊ’ अशी धमकी दिली. या भीतीमुळे फिर्यादी आणि त्यांच्या पतीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी दोन्ही महिला आरोपींना प्रत्येकी ३०-३० हजार रुपये दिले.