प्रकाश गायकर पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी शहरातील भाजप आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. आधीच शहरामध्ये गटा-तटात विभागलेल्या शिवसेनेला राज्यात पडलेल्या फुटीनंतर उतरती कळा लागली आहे. एक-एक शिवसैनिक बाहेर पडत असल्याने एन निवडणुकीच्या तोंडावर मशालीची धग कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच शहर पातळीवर योग्य व कणखर नेतृत्व नसल्याने संघटनात्मक बांधणी कोलमडली आहे. त्याचा फटका महापालिका निवडणुकीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांना वेग आला आहे. गतवेळच्या निवडणुकीमध्ये एकसंघ शिवसेनेने ९ जागांवर यश मिळवले होते. त्यावेळी देखील शहरामध्ये शिवसेनेमध्ये अनेक गट होते. त्याच शिवसेनेमध्ये आता उभी फूट पडली आहे. अनेकांनी सत्तेच्या सावलीत राहणे पसंत केले आहे. परिणामी सेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागली आहे. शहर प्रमुखपदी संजोग वाघेरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. शिवसेनेची ओळख असलेला आक्रमक चेहरा नसल्याने कार्यकर्त्यांमधला उत्साह हरवला आहे. दुसरीकडे आक्रमक चेहरा असणाऱ्या सुलभा उबाळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. तर माजी शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी देखील अलिप्त भूमिका घेतली आहे. परिणामी संघटनात्मक बांधणीमध्ये निष्क्रियता असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. नेतृत्वाचा अभाव असल्याने पक्षातून शिवसैनिकांनी काढता पाय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी साथ सोडली. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातील आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुलभा उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वीच माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि निलेश बारणे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेविका मीनल यादव, अमित गावडे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले यांच्याही पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. यांनी पक्ष सोडल्यास आणखीच धक्का बसणार आहे. पती शिवसैनिक, पत्नी राष्ट्रवादीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली होती. त्यांना शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असून त्यांची नुकतीच पिंपरी विधानसभेच्या संघटिका पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पती एका पक्षात आणि पत्नी एका पक्षात असल्याचे चित्र आहे. तर महापालिका निवडणुकीमध्ये पिंपरी येथील प्रभागामधून शिवसेनेचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने असल्यास वाघेरे नेमक कोणाचे काम करणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठींना याची कल्पना याबाबत बोलताना पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, संजोग वाघेरे यांच्याबाबत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कल्पना आहे. त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यांना एक कोणतीतरी भूमिका घेतली पाहिजे. त्यांना पक्ष बदलायचा असेल तर त्यांनी जावे जेणेकरून पक्षातील चांगल्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मिळेल.