पिंपरी – तोंडात ओढणी कोंबलेली, डोक्यात वार करुन निर्घृणपणे खून केलेल्या अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह देहूरोडजवळ मामुर्डी येथे आढळला. या घटनेला तब्बल तीन वर्ष उलटून गेली असून अद्याप त्या महिलेची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यास पोलीस तीन वर्षांनंतरही अपयश आल्याचेच स्पष्ट झाले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपूर्वी दाखल असलेला गुन्हा अद्याप उघडकीस आलेला नाही. 9 जून 2019 रोजी सकाळी देहूरोड बायपासला मामुर्डी येथे रस्त्याच्या बाजूला एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती. तिच्या तोंडात ओढणी कोंबली होती. त्यामुळे तिला मारतेवेळी तिने आरडाओरडा करु नये म्हणून तिचे ओढणीने तोंड दाबले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.
महिलेच्या डोक्यात बऱ्याच जखमा होत्या. तिचे डोके दगडाने ठेचून तिला मारण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कच-यात महिलेला टाकून दिले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तीन वर्ष झाले तरी अजूनही त्या महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी महिलेच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती काढली, तर त्यातही पोलिसांना अपयश आले. महिलेला अज्ञात ठिकाणी मारुन तिला मामुर्डी येथे टाकले असण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्याचेच स्पष्ट झाले आहे.
“त्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान अन्य प्रकारे देखील तपास केला जात आहे. लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल.”
– वर्षाराणी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक