Pimpri : शासकीय रुग्णालयांनी दाखल करून न घेतलेल्या बेवारस रुग्णांच्या जिवावर संकट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले जाणारे बेवारस रुग्ण अनेकदा इतरत्र उपचारासाठी पाठविले जातात. मात्र ससून रुग्णालयाने अशा रुग्णांना उपचारासाठी नकार देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यात फक्त वायसीएम व ससून रुग्णालयांमध्येच बेवारस रुग्णांवर उपचार केले जात असल्याने या दोन रुग्णालयांवरचा ताण अधिक वाढत आहे.
याच आठवड्यात टीबीग्रस्त एका बेवारस रुग्णाला वायसीएम रुग्णालयातून पुण्यातील औंध येथील सरकारी औंध उरो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, याप्रकरणी एका लोकप्रतिनिधींनी देखील रुग्णालयाशी संपर्क साधून विनंती केली, तरीही संबंधित डॉक्टरांनी त्यास दाखल करून घेतले नाही. परिणामी तो रुग्ण पुन्हा वायसीएममध्ये आणण्यात आला. वायसीएम रुग्णालयात टीबी आजारावर उपचाराची सोय नाही. त्यामुळे अशा रुग्णावर कसे उपचार करायचे, असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे.
वायसीएममधील सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “या रुग्णांवर उपचार करण्याचा अधिकार नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. यातील काही रुग्ण मानसिक आजारांनी ग्रस्त असतात, तर काही गंभीर आजारांमध्ये आहेत. त्यांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
ससून रुग्णालयातही वारंवार बेवारस रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप वायसीएम रुग्णालयातील मधील कर्मचाऱ्यांनी केला आहे. काही वेळा हे रुग्ण रस्त्यावर, उड्डाणपूलाखाली, स्टेशन परिसरात अर्धनग्न अवस्थेत आढळून येतात. त्यांना वायसीएममध्ये प्राथमिक उपचार देऊन जर वायसीएम रुग्णालयात त्या आजारावरील उपचारासाठी साय नसल्यास ससून रुग्णालयात पाठविले जाते. मात्र जेव्हा ते रुग्ण ससून रुग्णालयात नाकारले जातात, तेव्हा त्यांच्या जीविताचा धोका अधिकच वाढतो.
ही गंभीर परिस्थिती पाहता, बेवारस रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र किंवा शासनाकडून ठोस धोरण आखले जाणे अत्यावश्यक आहे. केवळ वायसीएम आणि ससूनवर जबाबदारी सोपवणे ही अन्यायकारक बाब असल्याची भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे. याप्रकरणी महापालिका, आरोग्य विभाग व राज्य शासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
तोपर्यंत रुग्णवाहिका उभीच
अनेकदा वायसीएम रुग्णालयातून रुग्णवाहिकेतून रुग्णास ससून रुग्णालयात पाठविण्यात येते. तेथे कमीत कमी तीन ते चार तासांचा वेळ लागतो. जोपर्यंत रुग्णास ॲडमिट केले जात नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका आणि त्यासोबत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांस परत माघारी येता येत नाही. त्यामुळे अनेक चालक बेवारस रुग्णास ससून रुग्णालयात नेण्यास तयार होत नाहीत.
ज्या बेवारस रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचाराची सोय नसते, अशाच रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात येतो. अनाथ, गरीब रुग्णांना ससून आणि वायसीएम रुग्णालयाशिवाय अन्य पर्याय नाही. मात्र बेवारस रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. खूप विनंत्या केल्यावर घेतलेच तरी शुल्लक बाबी काढून त्रास दिला जातो.
– कुंडलिक आमले, सामाजसेवक, वायसीएम रुग्णालयवायसीएम रुग्णालयात २०१० पासून रिअल लाइफ रिअल पीपल ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था बेवारस रुग्णांवर उपचारादरम्यान मदत करते. रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर आवश्यक असल्यास पिंपरीतील सावली निवारा केंद्रात ठेवते. त्यास रोजगारासाठी मदतही केली जाते.
– एम. ए. हुसेन, संस्थापक अध्यक्ष, रिअल लाइफ रिअल पीपल





