Pimpri : पिंपळे सौदागरमधील दवाखाना आणि तालीमीची अवस्था दयनीय

पिंपरी : रहाटणी-पिंपळे सौदागर (प्रभाग क्र. २८) येथील महापालिकेच्या दवाखान्याची व तालमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. त्या ठिकाणी नव्याने आधुनिक सुविधांनी युक्त वास्तू उभारण्यात याव्यात, अशी लेखी मागणी माजी नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या भागातील दवाखाना अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला असून, सध्या त्याठिकाणी जागेअभावी नागरिकांना बसण्यास अडचण निर्माण होत आहे. लसीकरणासारख्या नियमित आरोग्य सेवांच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होते. दवाखान्याबाहेर तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड उभारण्यात आलेला असला तरी तो पुरेसा नाही, असेही काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच पिंपळे सौदागर परिसरात कुस्ती, कबड्डीसह विविध खेळातील अनेक खेळाडू असून त्यांच्यासाठी उभारण्यात आलेली तालीमीची देखील वारंवार देखभाल दुरूस्ती करावी लागत आहे. सद्यस्थितीत ती इमारतही जुनी आणि जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने आणि आधुनिक पद्धतीने दवाखाना व तालीम बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या मागणीसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक नाना काटे यांनी व्यक्त केली आहे.





