Pimpri : बेंगलोर-मुंबई महामार्गाला नदीचे स्वरूप

पिंपरी : शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ताथवडे आणि पुनावळे येथील महामार्गावर आले. तब्बल तीन फूट पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि दुर्लक्षाचा फटका पुन्हा एकदा वाहन चालकांना बसला.
पश्चिमेकडील ताथवडे व पुनावळे परिसर वेगाने विकसित होत असूनही, त्या भागात महापालिकेकडून योग्य पद्धतीने ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनचे नियोजन झालेले नाही. या परिसरातील नैसर्गिक नाले आणि ओढ्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, महापालिकेने या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गांवर अडथळे निर्माण झाले असून, ते थेट रस्त्यावर पाणी साचत आहे.
सोमवारी पावसामुळे इंदिरा कॉलेज समोर मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पावसाचे साचलेले पाणी वाहतुकीस अडथळा ठरत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांना दीर्घ वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. पुनावळे आणि ताथवडे येथील अंडरपासदेखील पाण्याखाली गेले होते. नागरिक आणि वाहनचालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पुनावळे माळवाडी परिसरात अनेक वसाहती वाढले आहेत. या भागातील रस्ते व ड्रेनेज योग्य पद्धतीने विकसित झाले नाही. अनेक नैसर्गिक ओढ्या नाल्यावर ती अतिक्रमणे झाल्यामुळे दरवर्षी पावसामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. महापालिकडून या भागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन नियोजित व्यवस्थापन करावे.
– नवनाथ ढवळे, उपाध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड





