Pimpri : साखर कारखान्याची निवडणूक होणार रंगतदार

वडगाव मावळ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार शुक्रवारी, ७ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.
त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकूण २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु महत्वाची घडामोड म्हणजे आमदार सुनील शेळके यांनी देखील साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत व्यक्ती उत्पादक सभासद, अनुसूचित जाती/जमाती, महिला राखीव प्रतिनिधी, इतर मागासवगीय प्रतिनिधी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी यांच्या एकूण २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
यानंतर समोर आलेल्या उमेदवारी अर्जांच्या यादीनुसार, गट नंबर ३ तळेगाव-वडगाव गटातून स्वतः आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी दाखल केली असून याच गटातून त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचाही उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामुळे आता आमदारांच्या एन्ट्रीनंतर साखर कारखान्याची निवडणूक आणखीन रंगतदार अवस्थेत आली आहे.





