खालापूर : खोपोली नगरपरिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून खोपोली शहरात रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये खोपोली अग्निशामक केंद्र येथे ईव्ही चार्जिंग स्टेशन, जून्या मुंबई-पूणे महामार्गाशेजारी बांबू रोपवाटिका, आणि खोपोली नगरपरिषद कार्यालय इमारतीचे आवारात कापडी पिशवी वेंडिंग मशीन आदी उपक्रमांचा समावेश आहे. खोपोली नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात खोपोली नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतीचे सविस्तर नगरभूमापन करून मिळकतीचे नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने कार्यान्वीत केलेल्या प्रकल्पाचा शुभारंभ आणि दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, त्याचप्रमाणे इतर योजनांची माहिती महिला बचत गटांना जिल्हाधिकारी जावळे यांच्या यावेळी दिली. तसेच पीएम स्वनिधी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रायगड जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, भूमि अभिलेख कोकण प्रदेशचे उपसंचालक अनिल माने, रायगड भूमि अभिलेख अधीक्षक सुनील इंदलकर, खालापूर भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रमोद जरग, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.