पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ६२ कोटींच्या निधीतून रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील इतर भागात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासनाचा हा “दिसण्यासाठीचा विकास” नागरिकांच्या संतापाचा विषय ठरला आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील ५२ किमी मार्गावर गुळगुळीत रस्ते, मॅनहोल समांतर करणे, सौंदर्यीकरण आणि जंक्शन सुधारणा करण्यात येणार आहेत. मात्र पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, वाकड, भोसरी परिसरातील खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. स्पर्धा संपल्यानंतर हेच रस्ते पुन्हा खड्ड्यांनी भरतील, तर हा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते केवळ परदेशी स्पर्धकांसाठीच का, आमच्यासाठी नाहीत का? महापालिकेच्या धोरणामुळे रस्त्यांची वाट पिंपरी चिंचवड महापालिकेने यापूर्वीच शहरातील रस्त्यांचा विकास अर्बन स्ट्रीट नुसार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अरूंद होत चालले आहे. ते कमी की काय म्हणून चौकाची रूंदी कमी करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. महापालिकेच्या या धाेरणामुळे शहरातील रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. ‘१६ किंवा १९ जानेवारी २०२६ रोजी ही स्पर्धा होणार असून त्यासाठी ६२ कोटी रुपयांच्या तीन निविदा काढल्या आहेत. मात्र येत्या १५ डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याची योजना महापालिकेने आखली आहे.’ – मकरंद निकम, शहर अभियंता “आमचा कर जातो कुठे?” – आम्ही दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स, वाहनकर, इंधनकर भरतो. पण आमच्यासाठी रस्त्यांचे खड्डे भरले जात नाहीत. आता एका दिवसाच्या सायकल स्पर्धेसाठी मात्र ६२ कोटी रुपयांचा निधी सहज मिळतो! हे प्रशासनाचे दुहेरी धोरण आहे. – स्पर्धा एक दिवसाची आहे, पण आम्ही रोज या रस्त्यांवरून प्रवास करतो. मग आमच्यासाठी कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते का नाहीत? – सायकलिंगसाठी परदेशी खेळाडू येणार म्हणून शहराला झळाळी दिली जात आहे. पण वर्षभर नागरिक खड्ड्यांमुळे मरतात, त्याकडे कोण पाहणार?” नागरिकांची एकमुखी मागणी – स्पर्धेपुरते नव्हे, कायमस्वरूपी गुळगुळीत रस्ते हवे! – प्रशासनाने खड्डेमुक्त शहराचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवावे! – टॅक्स आमचा, रस्ते त्यांचे, हे चालणार नाही!