पिंपळे गुरव : हजारो कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव येथे निकाली कुस्त्यांची दंगल पाहायला मिळाली. पहिल्या क्रमाकांच्या कुस्तीत अप्रतिम डाव टाकत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने चांदीची गढ़ा पटकाविली. त्यांनी हरियानाच्या पहिलवानाला चीतपट केले. पिंपळे गुरवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त वरील निकाली कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल आशिष कुमार यांच्यात पहिल्या क्रमाकांची कुस्ती झाली. दोघेही एकमेकांवर डाव-प्रतिडाव टाकत होते. त्यांचा जोश आणि जिगरबाज खेळाबरोबरच कुस्ती शौकिनांचा जल्लोषही दिसून येत होता. मात्र २० ते २५ मिनिटे झाल्यावर कुस्ती निकाली निघत नसल्याचे पाहून ३ मिनिटे वाढवून गुणांवर कुस्ती होईल, असे संयोजकांनी जाहीर केले. त्यानंतर सिकंदरने आक्रमक पवित्रा घेत आशिष कुमार याला चीतपट केले. तसेच दीड लाख रुपयांचे बक्षीस आणि चांदीची गदा पटकावली. पारंपरिक पद्धतीने रविवारी संध्याकाळी उत्सवाचा सांगता समारंभ पार पडला. आरती, महाप्रसाद व आशीर्वादाने भक्तिभावात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, उत्सव समिती पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.