Pimpri : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवस्मारक

मावळ : किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शिवस्मारकाचे काम तातडीने हाती घ्यावे आणि कामास गती द्यावी. यासह गडावरील महादेवाच्या मंदिराचा जिर्णोद्धार करावा, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लोहगडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत लवकर समावेश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि.१७) लोहगड किल्याला भेट दिली. संपूर्ण गडावर फिरुन पाहणी केली. गडावर चाललेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे सचिन टेकाळे, सरपंच सोनाली बैवरे, उपसरपंच पंढरीनाथ विखार, शिवसेनेचे पदाधिकारी शरदराव हुलावळे, राजेंद्र तरस, गणेश धानीवले, राम सावंत, अमित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, लोहगड किल्याच्या पायथ्याशी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. हे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामासाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेऊन शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे.
लोहगडासह मावळ तालुक्यात विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले आहेत. कार्ला, भाजे लेणी आहे. त्यामुळे किल्ल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन वाढीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गडकिल्ल्यांवर येणारे शिवप्रेमी, शिवभक्त, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.





