देहूगाव : तीर्थक्षेत्र देहू येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९५ जयंती सोमवारी ( दि.१७ ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी, बोडकेवाडी आणि झेंडेमाळा परिसरातून “.एक गाव एक शिवजयंती ” दरवर्षी साजरा करण्यात येते. यंदा श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी, सरदार कान्होजी जेधे, सरलष्कर मोहिते हंबीरराव, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पगडी असलेले भक्ती शक्ती रथ , धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचा देखावा तर श्रीराम भक्त बलशाली हनुमानाच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची मिरवणूक विठ्ठलवाडी येथून सायंकाळी प्रारंभ करण्यात आला.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले. ” श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी , प्रभू श्री रामचंद्र की जय , बलशाली हनुमान की जय,” अशा जोरदार घोषणा देताना परिसर दुमदुमून गेला होता. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, शासकीय, निमशासकीय, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या . मिरवणूक देहू आळंदी मार्गे विद्युत रोषणाईने सजविलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली .त्यानंतर मुख्य कमानीवरून आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर मिरवणुक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे मुख्य मंदिराजवळ महाद्वार चौकामध्ये आल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक व देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतूनच नव्हे तर जिल्ह्यातून शिवभक्तांनी तीर्थक्षेत्र देहूत हजेरी लावली होती. पोलिसांचा बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. यावेळी देहूत येणारे मार्ग थोड्या वेळासाठी बंद करण्यात आले होते.