Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

पिंपरी : अखेर बहुप्रतिक्षित भाजप शहराध्यक्षांची यादी जाहीर झाली असून पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक आणि शहर कार्याध्यक्ष असलेल्या शत्रुघ्न काटे यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
शहराध्यक्ष पदासाठी शहरातून अनेक भाजप पदाधिकारी इच्छुक होते. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेले पक्षकार्य पाहता पक्षांनी त्यांच्यावर शहराध्यक्ष पद आणि पर्यायाने महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता पाहता पक्षाची विजयी घौडदौड कायम ठेवण्याचे मोठे आव्हान शत्रुघ्न काटे यांच्यासमोर असणार आहे.
यापूर्वी आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. या तिघांच्याही काळात शहरात पक्षाचा आलेख चढता राहिला आहे. २०१४ नंतर भाजपने सर्व निवडणुकांमध्ये शहरात मोठे मताधिक्य मिळविले आहे. हीच परंपरा आणि पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्याची जबाबदारी आता शत्रुघ्न काट यांच्यावर आहे.
शत्रुघ्न काटे दीर्घकाळापासून भाजपसोबत आहेत. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात असत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक होते. परंतु संधी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती, परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढत त्यांना शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती.
शंकर जगताप यांना उमेदवारी मिळताच त्यांनी मागील सर्व विसरुन पक्षहितासाठी कार्य करत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सकि्रय भूमिका निभावली होती. यामुळे पक्षाचा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.





