Pimpri : साईनाथ नगरमध्ये रस्त्यावरून वाहतय सांडपाणी

पिंपरी : थेरगावमधील साईनाथ नगरमध्ये वारंवार ड्रेनेज लाइन चोकअप होत आहे. त्यामुळे रस्त्यावरूनच सांडपाणी वाहत आहे. या पाण्यातूनच लहान मुलांसह नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
साईनाथ नगर, थेरगाव या परिसरातील ड्रेनेज लाइन वारंवार चोकअप होत आहे. ड्रेनेज लाइन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी घरांसमोरील रस्त्यावरून वाहत आहे. याची दुर्गंधी तर येतेच. मात्र या सांडपाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून महापालिकेकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.
मात्र महापालिकेचे अधिकारी बघू, करू, सांगू अशी उत्तरे देतात. काही अधिकारी तर नीट बोलत देखील नाहीत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिकेचे कर्मचारी ड्रेनेज लाइनचे चोकअप काढतात. मात्र काही दिवसातच पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. या परिसरात नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.





