Pimpri : बंद संकेतस्थळाच्या लोकार्पणाची घाई

पिंपरी : महापालिकेच्या वतीने संकेतस्थळामध्ये (वेबसाइट) बदल करण्यात आला आहे. नवीन संकेतस्थळ बनवण्यात आले असून त्यावर अद्याप माहिती अपलोड करण्यात आली नाही. गतवर्षीची माहिती संकेतस्थळावर असून यावर्षीची माहिती अपलोड करण्यात आली नाही. असे असताना बंद संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले आहेत. परिणामी नागरिकांना अद्यावत माहिती उपलब्ध होत नाही.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरविण्यासाठी संकेतस्थळ बनवण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे संकेतस्थळ आता सर्व नागरिकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये माहितीचा अभाव आहे. जुन्या संकेतस्थळावर सामान्य प्रशासन विभागाची परिपत्रके तात्काळ अपलोड होत होती. मात्र, नवीन संकतेस्थळावर ऑगस्ट २०२४ ची परिपत्रके अपलोड करण्यात आली आहेत.
इतर विभागांच्या परिपत्रकांमध्ये देखील यावर्षीची परिपत्रके अपलोड करण्यात आली नाहीत. दहा कलमी कार्यक्रम २०१३ सालचा अपलोड करण्यात आला आहे. तर संकेतस्थळामध्ये अनेक टॅब (बटण) तयार करण्यात आले आहेत. त्यावर क्लिक करून नागरिकांना हवी ती माहिती ते मिळवू शकतात. मात्र, त्यावर क्लिक केल्यानंतर ते टॅब सुरू होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या नवीन संकेतस्थळासाठी महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आणि उज्वला गोडसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तक्रार नोंदणी कशी करणार?
सारथी या बटणावर क्लिक केल्यानंतर फक्त सारथी नावाचे एक पोस्टर खुले होते. तर तक्रार नोंदणी करण्यासाठी असलेल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर ते सुरू होत नाही. त्यामुळे महापालिका किंवा इतर बाबींबाबत तक्रार कशी करायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवीन संकेतस्थळाबाबत महापालिकेचे दावे
दिव्यांग नागरिकांसाठी हे संकेतस्थळ सुलभ असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच चॅट जीपीटीचा वापर करून माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून नागरिकांचे प्रश्न अधिक वेगात आणि अचूकतेने हाताळण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. हॅकथॉन २०२५ अंतर्गत मिळालेल्या देशभरातील १७५ तज्ज्ञ सहभागींच्या अभिप्रायानुसार संकेतस्थळात सुधारणा करण्यात आल्या असून एथिकल हॅकर्समार्फत सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संकेतस्थळाचे डिझाइन करण्यात आले आहे. करसंकलन, देयके भरणे, तक्रारी नोंदवणे यांसारख्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, हे संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू न होताच त्याचे लोकार्पण करत अधिकार्यांनी शाबासकी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. विभागांना माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. नवीन डिझाइननुसार संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. लवकरच सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड होईल. संकेतस्थळाच्या डिझाइनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून माहिती शोधण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि संवादात्मक केली आहे.
– :निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान व





