Pimpri : डुडुळगाव गृहप्रकल्पात मूलभूत सुविधेसाठी १७ कोटींचा खर्च

पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प खर्चात मोठी वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी तब्बल १६८ कोटी रुपये खर्च करून गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या गृहप्रकल्पात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३ कोटी ९७ लाख ७७ हजार ९२७ रूपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच, प्रकल्पाशेजारी नाला विकसित करण्यासाठी ३ कोटी १७ लाख ७८ हजार ८४१ रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.
या गृहप्रकल्पात १ हजार १९० सदनिकांसाठी १५ मजली उंचीच्या ५ इमारती बांधण्यात येत आहेत. प्रकल्पात ३२३ चौरस फुट कारपेट एरियाचे सदनिका आहेत. ते १६८ कोटी रुपये खर्चाचे काम गुजरात येथील शांती कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदारामार्फत २३ मे २०२३ पासून सुरू आहे. या कामाची मुदत अडीच वर्ष आहे.
या प्रकल्पात मूलभूत सुविधा पुरविण्याच्या कामासाठी निविदा दर मागविण्यात आले होते. त्यासाठी शांती कन्स्ट्रक्शनची १३ कोटी ९७ लाख ७७ हजार ९२७ रुपयांची ४.१० टक्के अधिक दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या निविदेत १५ ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३ ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या. या कामाची मुदत दीड वर्ष आहे.
प्रकल्पाशेजारी नाला विकसित करण्यासााठी निविदा दर मागविण्यात आले. त्यासाठी एकूण १५ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यात दोन ठेकेदार पात्र ठरले. त्यात ४.२७ टक्के अधिक दराची शांती कन्स्ट्रक्शनचीच ३ कोटी १७ लाख ७८ हजार ९४१ रुपये खर्च स्वीकृत करण्यात आला आहे. या कामाची मुदत दीड वर्ष आहे.
या दोन कामांसाठी एकूण १७ कोटी १५ लाख ५६ हजार ७६८ रूपये अधिक खर्च या प्रकल्पावर करण्यात येणार आहे. त्या नव्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
दरम्यान, या गृहप्रकल्पातील विविध अतिरिक्त कामांसाठी या प्रकल्पाचा खर्च वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.





