Pimpri : खड्ड्यात रस्ते, पालिका म्हणते फक्त १३५६ खड्डे

पिंपरी : कोट्यवधी रुपये रस्ते बनविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी दरवर्षी खर्च करुनही शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील बहुतेक रस्त्यांना खड्डे पडले असून नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे. सर्वांत आश्चर्यजनक बाब म्हणजे रस्त्यांची दुर्दशा उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिका मात्र शहरात केवळ १३५६ खड्डे असल्याचा व त्यातीलही एक हजाराहून अधिक ठीक केल्याचा दावा करत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये छोटे-मोठे अपघात होत आहेत. सध्या खड्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करू नये, असा आदेश महापालिकेने काढला होता. मात्र, १५ मेनंतरही शहरातील काही भागांत खोदकाम सुरूच आहे. पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज, स्थापत्य, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, इतर काही विभागांकडून तसेच, महामेट्रोकडून रस्ते व पदपथ खोदाई कायम आहे. मोशी, तळवडे, रावेत, किवळे, चिखली, आकुर्डी, थरमॅक्स चौक, देहू-आळंदी रस्ता, भोसरी, दळवीनगर, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, सांगवी, कासारवाडी, निगडी, प्राधिकरण, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, एमआयडीसी आदी भागांतील रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत.
पावसामुळे खड्ड्यांचा आकार मोठा झाला आहे. पूर्वी केलेले दुरूस्ती कामामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पेव्हिंग ब्लॉक निघाले आहेत. चिखल झाला असून, खड्डी रस्त्यावर पसरली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज व पावसाळी गटाराची झाकणे तुटली आहेत. काही गायब झाली आहेत. खराब रस्ते, खड्डी, चिखल तसेच, ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसाळ्याच्या सुरूवातीलाच शहरातील रस्त्यांची ही अवस्था झाली असल्याने पुढील चार महिने शहरवासियांना खड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
लवकर आलेल्या पावसाने उडाला गोंधळ
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पहिला पाऊस पडल्यानंतर १५ जूननंतर दुरूस्तीचे काम हाती घेतले जाते. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली जाते. डांबरीकरण, काँकि्रट, पेव्हिंग ब्लॉकद्वारे खड्डे बुजविले जातात. मात्र, यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. जून महिन्याचे दहा दिवस उलटल्यानंतरही शहरभऱात खड्डे दिसत आहेत.
विकासकामांमुळे खड्डे
महामेट्रोच्या कामामुळे दापोडी ते कासारवाडी मार्गावरील ग्रेडसेपरेटर मार्गाची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे चांगल्या काँक्रिटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रीटचे रस्ते दुरूस्त करण्याचे काम महामेट्रोकडून शंकरवाडी, कासारवाडी येथे संथगतीने सुरू आहे. त्यासाठी ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तसेच, पिंपरी मेट्रो स्टेशनच्या खाली काम सुरू असल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. रस्त्यावर खड्डी पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पालिकेचे दावे
मे मध्ये झालेल्या पावसामुळे विविध भागात ५०८ खड्डे पडले तर पावसाळ्यापूर्वी ८५५ असे एकूण १३५६ खड्डे शहरात आढळले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यापैकी सुमारे १००० खड्डे खड्डे बुजविले असून साडे तीनशेहून अधिक खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसाने उघडीप दिल्याने शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एक हजारहून अधिक खड्डे बुजवले आहेत. दरवर्षी या कामास १५ जूननंतर सुरूवात केली जात होती. यंदा लवकर सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील.
– मकरंद निकम, शहर अभियंता





