Pimpri : कुदळवाडीतील ८५० एकर परिसरात रस्त्यांचा खर्च वाढला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने सलग सात दिवस अतिक्रमण विरोधी कारवाई करीत चिखलीतील कुदळवाडी भागांतील भंगार दुकाने, गोदाम, इतर आस्थापना तसेच, लघुउद्योगांवर कारवाई केली. त्यात एकूण ८५० एकर जागा रिकामी करण्यात आली. त्या भागांत चालू विकासकामातूनच विविध आठ डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्याचा खर्च तब्बल २६ कोटी रूपयांने वाढला आहे. ते काम निविदा न काढता काम करीत असलेल्या चालू ठेकेदारांना बहाल करण्यात येणार आहे.
महापालिकेने धडक कारवाई करीत कुदळवाडी परिसरातील एकूण ८५० एकर जागेतील अनधिकृत बांधकामे व पत्राशेड जमीनदोस्त केले. त्या भागांत डीपी रस्ते तातडीने विकसित न करण्यास महापालिकेच्या स्थापत्य विभाग सरसावला आहे. या नव्या रस्त्यांमुळे देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ते तयार न केल्यास जागेवर पुन्हा अतिक्रमण होण्याची भीती महापालिका प्रशासनाला सतावत आहे. त्यामुळे तातडीने रस्ते विकसित करण्यासाठी स्थापत्य विभागाची धावपळ सुरू आहे.
ती कामे क आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या चालू विकासकामातून केली जाणार आहेत. त्यासाठी नव्याने निविदा काढली जाणार नाही. ते काम थेट पद्धतीने संबंधित ठेकेदारांला दिले जाणार आहे. त्या कामाची दरसूची सन २०२०-२१ ची आहे. चालू सन २०२२-२३ ची दरसूचीत २० टक्कांची तफावत आहे. त्यानुसार स्थापत्य विभागाने चालू कामात २० टक्क्यांने वाढ केली आहे. त्यामुळे त्या भागांतील विविध आठ रस्त्यांचा खर्च तब्बल २५ कोटी ९१ लाख रूपयांनी वाढला आहे. त्या वाढीव सुधारित खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.





