पिंपरी – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. एकेकाळी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असलेल्या महापालिकेच्या ठेवी गेल्या काही वर्षांपासून घटत असून कर्जाचा डोंगर वाढत आहे. गेल्या दशकभरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली अनावश्यक कामांवर झालेल्या उधळपट्टीने महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडली आहे. परिणामी आर्थिक स्थिती चिंताजनक झाली असून गेल्या दहा वर्षात महापालिकेच्या तब्बल १ हजार ३३० कोटींच्या ठेवी कमी झाल्या आहेत तर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाचशे कोटीहून अधिक कर्ज आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडत असताना अधिकारी मात्र आर्थिक स्थिती स्थिर असल्याचा दावा करत आहेत. पण ठेवींचा घटता आलेख आणि वाढते कर्ज पाहता प्रशासनाने आर्थिक शिस्त आणि निधीचा वापर याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील एका लोकप्रतिनिधीने महापालिकेवर असलेल्या ठेवींची माहिती मागविली होती. त्या लोकप्रतिनिधीस दिलेल्या माहितीवरून ठेवींची आकडेवारी समोर आली आहे. २०१५-१६ मध्ये महापालिकेकडे सर्वसाधारण आणि इतर निधी मिळून तब्बल ६ हजार ८६२ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. त्यानंतर काही वर्षांत ठेवीत मोठी घट झाली. २०१८-१९ मध्ये या ठेवी ४ हजार १९४ कोटींवर, तर २०२२-२३ मध्ये केवळ ३ हजार ४७३ कोटी रुपयांवर आल्या. त्यानंतर २०२३-२४ मध्ये एकदम ठेवी वाढून ५ हजार ६३३ कोटींवर पोहोचल्या, मात्र पुन्हा २०२४-२५ मध्ये ५ हजार ५३२ कोटींवर घसरल्या. या आकडेवारीचा विचार केला तर दहा वर्षांपूर्वी महापालिकेची असलेली श्रीमंती आता नाही हे स्पष्ट होत आहे. तसेच महापालिकेचा ब वर्गात समावेश असल्याने वर्ग १ ते वर्ग ४ चे कर्मचारी, तसेच बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून घेतलेले कर्मचारी, निवृत्तीवेतन यावर देखील हजारो कोटी रुपयांचा खर्च आहे. पुढील काळात याच पद्धतीने अनावश्यक प्रकल्प आणि विकासकामांवर खर्च करत राहिल्यास महापालिकेची स्थिती आणखी बिकट होऊन कर्मचार्यांचे पगार देण्यास देखील कर्ज काढण्याची वेळ पालिकेवर येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. महापालिकेवर ५६० कोटींचे कर्ज… महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुल बांधण्यासाठी १५९ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज घेतले. ते कर्ज ३० वर्षासाठी आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी ४ वर्षे कालावधीसाठी म्युन्सिपल बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. हरित सेतू आणि टेल्को रस्तावर अर्बन स्ट्रीट डिजाईनद्वारे सुशोभिकरण करण्यासाठी ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्याचा कालावधी ५ वर्षे आहे. असे महापालिकेने एकूण ५५९ कोटी ९१ लाखांचे कर्ज व कर्जरोखे काढले आहेत. त्यापैकी एकूण ३६४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे. ‘सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील ऑक्टोबर २०२५ पर्यंत महापालिकेकडे सर्वसाधारण निधी २ हजार ३६२ कोटी आणि राखीव निधी २ हजार ५३२ कोटी अशी एकूण ४ हजार ८९४ कोटी रुपयांच्या मुदतठेवी आहेत. महापालिकेने विविध विकासकामांसाठी कर्जरोखे काढले आहेत. त्यासाठी राज्य व केंद्रशासनाकडून ४६ कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यापैकी २६ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त, तर २० कोटी प्रलंबित आहे.’ – प्रविण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका