पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभा लढवलेले उमेदवार व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मंगळवारी (दि. २३) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला. मात्र, त्यांना शांत करत कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला. यामुळे चिंचवड विधानसभेमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. राहुल कलाटे हे शहरातील राजकारणाभोवती फिरणारे नाव आहे. त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते पद त्यांनी भूषवले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटेंना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपच्या शंकर जगतापांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. वाकड परिसरामध्ये त्यांची विशेष ताकद असल्याने भाजपाने त्यांना गळाला लावले आहे. त्यांच्या प्रवेशाला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह राम वाकडकर यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांना शांत करण्यात पक्षाला यश आल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.