मावळ | शेतकऱ्यांची रब्बी पिकाच्या पेरणीची लगबग सुरू

तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्यातील मुख्य खरीप भात पिकाच्या कापण्या पूर्ण झालेल्या असून आता मावळातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाच्या पेरण्याची लगबग सुरू झालेली आहे. यावर्षी भात पिकाचे उत्पन्न अतिशय चांगले आल्याने शेतकरी आनंदी व समाधानी आहेत.
मावळ तालुक्यात यावर्षी १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले होते. या सर्व भात पिकाची कापणी पूर्ण झालेली असून यातील सुमारे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी भाताची झोडणी केलेली आहे. या वर्षी भात पिकाला चांगले उत्पन्न आल्याने शेतकरी अतिशय समाधानी आहेत. या वर्षी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ९५ टक्के क्षेत्रावर इंद्रायणी जातीचे भात पीक घेतलेले आहे. तर अन्य ५ टक्के फुले समृद्धी, कोलम, आंबेमोहोर, बासमती, स्थानिक ही भात पिके घेतलेली आहे.
मावळ तालुक्याचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरीप भात पिकासाठी शेतकऱ्यांना प्रथमपासून कापणीपर्यंत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे वेळोवेळी आलेल्या अडचणी संदर्भात प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यावर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने ताण दिल्याने जुलै महिन्यापासून खरीप भात पिकाच्या लावणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे भात पीक पूर्ण कापणीस तयार झाले होते.
मावळ तालुका हा अति पावसाळी तालुका असून या तालुक्यात पावसावर येणारे मुख्य भात पिकच घेतल जाते. त्या प्रमाणे यावर्षी मावळ तालुक्यात शेतकऱ्यांनी भात पिक घेतले. वेळोवेळी झालेल्या मान्सूनच्या पावसाने भातपीक चांगले जोमात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळालेले आहे. अशी माहिती कृषी सहाय्यक अक्षय ढुमणे त्यांनी दिली.
भात पिकाच्या सर्व भागातील कापण्या पूर्ण झालेल्या असून त्याच क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरण्याही शेतकऱ्याने सुरू केली आहे. असे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले. मात्र, काही ठिकाणच्या भात खाचरमध्ये पाणी व वापसा नसल्याने त्या ठिकाणच्या पेरण्या रखडलेल्या आहेत.





