Pimpri : ‘तुकाराम महाराजांचे विचार आपल्या कृतीत आणा’

कार्ला : संत तुकाराम महाराज या शब्दात क्रांती असून आपल्यातील संत तुकाराम महाराज जागे करा, ते नाम रूपाने संपले असले तरी त्यांचे जीवन, त्यांनी दाखविलेला मार्ग व त्यांचे विचार आपल्या आचरणात व कृतीत आणले तर आपले जीवन सार्थक होईल, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केले.
वाकसई येथील संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान येथे बीज सोहळ्यानिमित्त हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्याचा व विचारधारेचा सखोल वेध त्यांनी घेतला. तसेच गाथेतील एक एक अभंग महत्त्वाचा असून हे अभंग आपल्या जीवनाचे कल्याण करतील व सार्थक बनवतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान एक पवित्र स्थळ
मुंबई-पुणे महामार्गावर वाकसई येथे असलेले संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्वाचे स्थान आहे. कोकणातील व्यापारासाठी जात असताना तुकाराम महाराज येथे काही काळ विसाव्यासाठी थांबत असत. येथे मागील २९ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असून तुकाराम बीज निमित्त हजारो वारकरी भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.





