पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या पुनावळे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, निकृष्ट रस्ते, अपुरा पाणीपुरवठा आणि आरोग्याच्या समस्यांचा दररोज सामना करावा लागत आहे. लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचलेल्या या वेगाने वाढणाऱ्या उपनगरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्याऐवजी वर्षानुवर्षे तीच कामे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे प्रखरपणे ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. गायकवाड वस्ती, माळवाडी, विजयनगर, पांढरे वस्ती, काटे वस्ती या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत आहे. तरी देखील रस्ते सुधारणा, वाहतूक नियोजन आणि मूलभूत सोयींचा विकास फारसा झालेला नाही. पुनावळे गावातून अंडरपास मार्गे काटेवस्ती, गायकवाड नगरकडे जाणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर दुभाजक नसल्याने वाहतुकीला शिस्त उरत नाही. सेवा रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याने दिवसेंदिवस कोंडी कायम राहते. पुनावळे अंडरपासची उंची व रुंदी वाढवण्याची नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. रुंदीकरणाची योजना कागदावर असली तरी प्रत्यक्षात कोणतीही हालचाल नाही. महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे कॅरेजवे वाढवणे, सार्वजनिक पार्किंगची सोय करणे, अंडरपास परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने विशेषतः पीक अवर्समध्ये प्रचंड कोंडी निर्माण होते. अवजड वाहनांवर बंदी असूनही सकाळ-संध्याकाळी डंपर, आरएमसी मिक्सर वाहने बेधडक मार्गक्रमण करतात. ही वाहने वेगात, अनेकदा विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. झाकण नसल्याने वाहनांमधील धूळ रस्त्यावर पसरते आणि प्रदूषण वाढते. दरम्यान, पुनावळ्याजवळील ६० एकरचा जंगल परिसर नागरिकांचा महत्त्वाचा हिरवळ पट्टा आहे. कचरा डेपोचा प्रस्ताव नागरिकांनी विरोध करून रद्द करवून घेतल्यानंतर येथे ऑक्सिजन पार्क करण्याची मागणी वाढली होती. मात्र नव्या डीपीमध्ये या ठिकाणी कमर्शियल इमारतीचे आरक्षण देण्यात आल्याने नागरिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुनावळ्याचा विकास आराखडा राजकीय आश्वासनांपुरता मर्यादित राहिल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटताना दिसत आहे. या समस्यांचे गांभीर्य पाहता आगामी निवडणुकीत ‘रस्ता-पाणी-कोंडी’ हेच प्रश्न निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. अंडरपास रुंदीकरणाचा प्रस्ताव १० वर्षे कागदावरच आहे. रस्त्यांचे आराखडे तयार होतात, पण अंमलबजावणीत वर्षानुवर्षे दिरंगाई. परिस्थिती आणखी बिकट होत आहे. – सुमित ढगे पाणीपुरवठा अनियमित, वीज समस्या रोजची. इन्व्हर्टरशिवाय राहणे अशक्य. समस्यांना कंटाळून मला परिसर सोडावा लागला. – रोहन चोडणकर घर अंडरपासपासून दोन मिनिटांवर; पण कोंडीमुळे पोचायला किमान अर्धा तास जातो. बाहेर पडताना नेहमी गुगल मॅप तपासावा लागतो. – प्रथमेश करडे नागरिकांच्या प्रमुख मागण्या ▪ आरएमसी प्लांट रहिवासी भागातून हटवावा ▪ अवजड वाहनांची व चालक कागदपत्रांची काटेकोर तपासणी ▪ वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करणे ▪ बंदीच्या वेळेत अवजड वाहतूक पूर्णपणे रोखणे ▪ नियमभंग करणाऱ्या वाहन मालकांवर कठोर कारवाई ▪ अंडरपास परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक