पिंपरी | प्रदूषण वाढले हवेची गुणवत्ता बिघडली

पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वायु गुणवत्ता निर्देशांकात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर हे प्रदुषित श्वास घेत आहेत. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे हानीकारक आहे. पिंपरीत 179 इतका वायु गुणवत्ता निर्देशांक नोंदविला गेला आहे. हवा प्रदुषणाची पातळी घटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.
गेली अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडकर प्रदुषित श्वास घेत आहेत .गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला तर दिल्ली मुंबई मधील हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे आढळले होते. पण त्याच्यापाठोपाठ आता औद्योगिक नगरी असलेले पिंपरी चिंचवड हे हवेच्या खराब गुणवत्तेत अग्रेसर होत आहे.
शहरातील धुळचे रस्ते, पिंपरी चिंचवडचा विचार करता खराब रस्त्यांवरील वाहतुकीमुळे उडनारे धुलीकण, सुरू असलेली बांधकामे, अनियंत्रित आरएमसी प्लॅन्ट, कचरा उघड्यावर जाळण्याचे प्रकार, विनाअच्छादन होणारी राडारोड्याची वाहतूक व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र या कारणांमुळे पिंपरी चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे.
निकषानुसार मानवी आरोग्यासाठी व शहराचा नैसर्गिक समतोल राकण्यासाठी वायु गुणवत्ता निर्देशांक हा 0 ते 50 एवढा असयला हवा. पण तो शहरात किमान 179 तर काही ठिकाणी 300 च्या पुढे गेलेला आढळत आहे. दिवाळीमध्ये तर तो 700 च्या पुढे होता. थंडी असल्याने गरजेपोटी सुरू असलेले शेकोटीचे प्रकार, चुलीवर बनवले जाणारे जेवण व लाकडावर होणारे अंत्यसंस्कार हे शहराच्या प्रदुषणात भर टाकत आहेत.





