Pimpri : रंग खेळा पण जरा जपून…

पिंपरी : गुरुवारी होळी आणि शुक्रवारी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. या सणाच्यावेळी काही अतिउत्साही तरुण फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून मारतात. त्यामुळे एखाद्याला इजा होऊ शकते. तर काहीजण पक्का रंग म्हणून रसायनिक रंगाचा वापर करतात. त्यामुळेही त्वचा आणि डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे रंग खेळताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा.
संपूर्ण देशभरात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण धुलिवंदनच्या दिवशी एकमेकांना रंग लावून सण साजरा करतात. धूलिवंदन साजरा करताना अनेकांना भान नसते, त्यामुळे रंग चुकून तोंडात, डोळ्यात आणि कानात जातो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कारण बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये केमिकल्स आणि इतर शरीरासाठी हानिकारक असणारे घटक असतात. त्यामुळे धूलिवंदन खेळताना रंगाचा वापर सावध होऊ केला पाहिजे.
२५ रुपयांना ११२ प्लॅस्टिक पिशव्या
गेल्या काही वर्षांपासून फुग्याऐवजी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मारण्यासाठी केला जात आहे. फुगा आणि प्लॅस्टिक पिशव्यामध्ये पाणी भरून त्या एकमेकांना मारल्या जातात. हे दोन्ही प्रकार घातक ठरू शकतात. सध्या बाजारात २५ रुपयांना ११२ प्लॅस्टिक पिशव्या मिळतात. फुग्यांच्या तुलनेत प्लॅस्टिक पिशव्या या स्वस्त असल्याने बच्चे कंपनीसह तरुण वर्गही याकडे वळत आहे. पाण्याने भरलेल्या पिशव्या मारल्यामुळे डोळे, कान याला इजा होऊ शकते. तसेच पिचकारी तोंडावर मारू नये, यासाठी आपल्या लहान मुलांना समजावून सांगा.
दुचाकीस्वाराला फुगे, पिशव्या मारू नका
अनेकजण दुचाकीवरून चाललेल्या चालकावर फुगे किंवा प्लॅस्टिक पिशव्या फेकून मारतात. फुग्यचा जोरदार फटका बसल्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल जाऊन त्याचा अपघात होऊ शकतो. यापूर्वी शहरत असे अपघात घडले आहेत. त्यामुळे आपला सण इतरांसाठी आयुष्यभराची दुखापत ठरू नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
टवाळखोरांना आवरण्याचे पोलिसांसमोर आवाहन
होळी खेळताना बहुतांशजण आपल्या मित्रांसोबत खेळतात. मात्र काही टवाळखोर रस्त्याने येणार्या जाणार्या नागरिकांना लक्ष्य करतात. त्यांना जबरदस्तीने रंग लावतात. काही ठिकाणी महिलांना फुगे मारण्याचे प्रकार घडतात. प्रथम पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अशा टवाळखोरांवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यादिवशी शेकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अशी कारवाई एकदाही झालेली नाही. त्यामुळे यंदा पोलीस टवाळखोरांबाबत काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रंगामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात
– रंगांमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की डोळ्यांची आग होणे, डोळ्यांच्या पापणीला आतून सूज येणे
– रंगांमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो, जसे की त्वचेला इजा होणे
– रंगांमुळे श्वसनसंस्थेला समस्या होऊ शकतात
– रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो
रंग खेळताना काळजी घेण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी
– रंग खेळण्यापूर्वी आणि नंतर त्वचा स्वच्छ करावी
– केमिकलयुक्त रंगांचा वापर करू नये
– शक्यतो गुलालमधील रंग वापरावे
– रंग खेळताना गॉगल वापरावेत
– रंग डोळ्यात गेल्यास सुती कापडाच्या साहाय्याने डोळे स्वच्छ करावेत
– रंग खेळून आल्यावर माईंड सोपने किंवा क्लींजर्सने त्वचा क्लीन करावी





