पिंपरी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) ताज्या अहवालानुसार, या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये पुण्यानंतर सर्वाधिक ध्वनीप्रदूषण पिंपरी-चिंचवड शहरात नोंदवले गेले. शहर ध्वनीप्रदूषणाच्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकांच्या काळात चाफेकर चौक, पिंपरीतील सुभाष घाट आणि प्राधिकरणातील गणेश तलाव या परिसरांत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाची मोजणी केली. रहिवासी तसेच व्यापारी क्षेत्रात डेसिबल मर्यादा ओलांडणारे आकडे समोर आले. सरासरी ९३ ते ९५ डेसिबल इतका आवाज नोंदवण्यात आला. प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या या आकड्यांवरून स्पष्ट होते की पिंपरी-चिंचवड, उत्सवकाळात ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीत राज्यातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मते, ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजात दीर्घकाळ राहिल्यास कानाच्या श्रवणेंद्रियावर परिणाम होतो, रक्तदाब वाढतो आणि ताण, निद्रानाश, हृदयरोग यांचा धोका वाढतो. दाट लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवडसारख्या भागांत हा प्रश्न आणखीन गंभीर ठरतो. दोन वर्षांपूर्वी हिंजवडी परिसरात डीजेच्या आवाजामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र तरीदेखील अनेक गणेश मंडळांकडून साऊंडच्या भिंती उभारल्या जातात. विशेष म्हणजे पोलिसांच्या डोळ्यादेखील हे कृत्य होत असताना केवळ दाखविण्यासाठी काही मंडळांवर गुन्हे दाखल केले जातात. सांगवी आणि भोसरी परिसरात तर डीजे नकोच्या पोलिसांच्या आवाहनाला केराची टोपली दाखविली जाते. ‘शांत’ गणेशोत्सवाची गरज पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुढील वर्षी ‘नो साऊंड झोन’ उपक्रम राबविण्याची गरज आहे. परंतु, स्थानिक मंडळांचे सहकार्य आणि नागरिकांचे सजग वर्तन यांवरच या उपक्रमाचे यश अवलंबून राहणार आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. पारंपरिक ढोल-ताशांचा सन्मान राखूनही शांततामय गणेशोत्सव साजरा करता येतो, असे ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडने यंदा ध्वनीप्रदूषणात दुसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी ध्वनी प्रदुषणात वाढ होत आहे. जास्त आवाज म्हणजे जास्त उत्साह, ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘शांत गणेशोत्सव’चे स्वप्न अजूनही दूरच राहील. शहर सरासरी आवाज पातळी (डेसिबल) पुणे – १००.९ पिंपरी-चिंचवड – ९५.४ सांगली – ९३.१ कोल्हापूर – ९२.५ मुंबई – ८९.७ नागपूर – ८८.३