लोणावळा : पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शांतता समितीच्या बैठकीत विविध जाती-धर्मांचे प्रतिनिधी, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर झालेल्या एका वादग्रस्त पोस्टनंतर शहरातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणारी आणि औरंगजेबाचे गुणगान करणारी पोस्ट केली होती, ज्यामुळे स्थानिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. बैठकीत सहभागी झालेल्या विविध पक्षांच्या तसेच धर्माच्या नेत्यांनी शहरातील शांतता राखण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला काँग्रेस नेते निखिल कवीश्वर, भाजपाचे देविदास कडू, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नासिरभाई शेख, शिवसेना शिंदे गटाचे संजय भोईर, आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व नागरिक उपस्थित होते. सर्वजण शिवरायांचे मावळ सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या आदराची भावना व्यक्त केली. “आम्ही वेगवेगळ्या समाजांचे असलो तरी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलो आहोत आणि शिवरायांचे मावळे आहोत,” असे एकमताने सांगण्यात आले. तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातील सण-उत्सव सर्व समाज एकत्र येऊन साजरे करण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.