Pimpri : पीडीसी बँकेतर्फे शेतकऱ्यांना होणार ५० कोटींचे कर्ज वाटप

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसी), शेती विकास सोसायट्यांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटप करणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली.
मावळ तालुका हा अति पावसाळी व खरीप पिकासाठी अग्रेसर असलेला तालुका आहे. या तालुक्यात खरीप भात पीक प्राधान्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या खरीप भात पीकाखाली एकूण १३ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप भात पीक व ३ हजार हेक्टर क्षेत्रात इतर खरीप पिके घेतली जातात.
तालुक्यातील खरीप भात पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती विकास सोसायट्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य दिले जाते. असे कर्ज वाटप १ एप्रिलपासून तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहे.
तालुक्यात एकूण ५५ शेती विकास सोसायटया, गावोगावी असून या सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी १ एप्रिलपासून आत्तापर्यंत ३ हजार ४६० शेतकऱ्यांना २८ कोटी ८ लाख रुपये कर्जाचे वाटप झालेले आहे. अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळ तालुका विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे यांनी दिली.
खरीप पीक कर्ज मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, संजय ढोरे, गुलाब ढोरे, धनंजय विधाटे, बाळासाहेब सावंत,धर्मा ठोंबरे, संभाजी केदारी, दत्तात्रय वारींगे, सचिन भानुसघरे, सोमनाथ जाधव, किरण लोहोर, तुकाराम लोहोर, बन्सी राक्षे, सुनील गाडे, उमेश वाडेकर, तुषार गाडे, अंकुश पिंपरकर, अमोल भोईरकर, भाऊ फाटक, पांडुरंग गावडे, संपत आडकर, सोमनाथ वाळुंज,अंकुश टाकळकर, सोमनाथ गायकवाड आदी सचिवांमार्फत गावोगावी वाटप चालू आहे.
मावळ तालुक्यात खरीप भात पीकासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणार असून या आर्थिक वर्षात शेतीबरोबरच शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, पॉलिहाऊस, फुल शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा ५० कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचा मनोदय आहे.
– माऊली दाभाडे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
पुणे जिल्हा सहकारी बँकेने शेती सोसायटी मार्फत या वर्षी १ एप्रिल पासून आतापर्यंत २८ कोटी रुपये वाटप केले असून हे कर्ज वाटप ३० सप्टेंबर अखेरपर्यंत गरजू शेतकऱ्यांना वाटप चालू राहणार आहे.
– गुलाबराव खांदवे, मावळ तालुका विभागीय अधिकारी,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक





