Pimpri : नगरपालिका बांधत असलेल्या शौचालयास विरोध

खालापूर : नगरपालिका चाळ, खालची खोपोली येथे समाजमंदिर आणि कब्रस्तान आहे. याठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून शौचालय बांधले जात आहे. या शौचालयाच्या बांधकामास सर्वधर्मीयांचा विरोध असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांच्याकडे दिले आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधून सुशोभिकरण करण्याची मागणी होत आहे.
समाजमंदिर तसेच मुस्लीम बांधवांचे कब्रस्तान आहे. याठिकाणी शौचालय बांधल्यास दुर्गंधी पसरू शकते. त्यापेक्षा येथे महापुरुषांचे स्मारक बांधून सुशोभिकरण केल्याने जागेचे पावित्र्य राखले जाईल, त्यामुळे येथे शौचालय न बांधता स्मारक उभारावे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचे युवानेते योगेश पुरी यांनी सांगितले.
खालची खोपोली येथे शौचालय असतानाही नव्याने शौचालय बांधण्याची गरज काय, असा प्रश्न आशपाक पटेल यांनी उपस्थित केला. तर, नगरपालिका चाळ व खालची खोपोलीतील बौध्द बांधवांचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी समाजमंदिर आहे, त्याबाजूला शौचालय बांधणे चुकीचे असल्याने महेश गायकवाड यांनी सांगितले.





