वडगाव मावळ : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज बाद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठाविण्याचा मार्ग अवलंबविण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मर्या., वडगाव मावळ यांना पत्र दिले असून याची प्रत सहकार आयुक्त राज्य, सहकार आयुक्त जिल्हा व सहकार मंत्री यांना पाठविली आहे. खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत सहकार नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे सांगत योग्य प्रक्रिया न राबवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अर्जावर सोमनाथ बबन कोंडे, विशाल वसंतराव वहिले, संजय रामदास वाजे यांच्या सह्या आहेत.